अनैतिक संबंधाच्या वादातून गावठी पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना कागल तालुक्यातील बाळेघोल येथे घडली आहे.ही घटना सोमवारी (दि.6) सकाळी 11 च्या सुमारास कापशी-बाळेघोल रस्त्यावरील चिरगे शेत परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भरत बळीराम चव्हाण (वय-30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर संशयित आरोपी विकास हेमंत मोहिते (वय-25 रा. बाळेघोल) हा मुरगूड पोलीस ठाण्यात स्वत:हुन हजर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विकास मोहिते याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय भरत चव्हाण याला होता. यातुनच भरत आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते. अखेर चार वर्षापूर्वी भरतने पत्नीला घटस्फोट दिला होता. तेव्हापासून आरोपी आणि मयत भरत यांच्यात पूर्ववैमनस्यातून वारंवार वाद होत होते. हा प्रकार मागील तीन ते चार वर्षापासून सुरु होता.
सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास भरत चव्हाण हा त्याचा मित्र ओंकार जाधव याच्यासोबत सेनापती कापशी हद्दीत असणाऱ्या चिरगे शेतात विहीरीवर कामासाठी जात होता. त्यावेळी विकास मोहिते याने त्या दोघांची दुचाकी आडवली. विकासने भरत याला दुचाकीवरुन खाली उतरवले व त्याच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत भरत चव्हाण याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. तर मोहिते याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला सहा महिन्याची मुलगी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी भेट दिली.मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे पुढील तपास करीत आहेत.