सध्या मुलांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर कुटुंबातील टीव्हीचा देखील अतिरेक वाढला आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या अतिरेकामुळे मुलांच्या अभ्यासावर होणारा दुष्परिणाम हा मोठा चिंतेचा विषय आहे.
त्यात सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावानं कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे गावाने एक अभिनव निर्णय घेतला आहे. या गावाने रात्री सात ते साडे आठ या कालावधीत गावातील मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील कौटुंबिक नात्यातील हरवलेला संवाद, लोप पावत चाललेली वाचन संस्कृती तसेच शाळा, महाविद्यालयाच्या अभ्यासासाठी गावातील मोबाईल, टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तळसंदे गावच्या सरपंच शुभांगी कुंभार यांनी नागरिकांना या अभिनव उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी गावात सात वाजता भोंगा वाजल्यानंतर आपला टीव्ही व मोबाईल बंद करुन या उपक्रमात सहभागी व्हावं. हा उपक्रम ८ मार्चपासून गावात सुरु करण्यात आलेला आहे.
मुलांचा रात्रीच्या वेळी घरातील टीव्ही सुरु असल्यामुळे आणि मोबाईल फोनमुळे अभ्यास होत नाही किंवा मुलंच टीव्ही तसंच मोबाईल फोनच्या नादापायी अभ्यास करत नाहीत ही अडचण प्रत्येकाच्या घरातील आहे. पण यावर उपाय तरी काय काढायचा, मुलांना अभ्यासात कसे गुंतवायचे हा प्रश्न पालकांना पडलेला असतो. मात्र, काही गावांनी या समस्येवर रामबाण उपाय शोधून काढला आहे. पूर्ण गावातील मोबाईल, टीव्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी ‘या’ गावांनी घेतला असाच निर्णय
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील 3 हजार 105 लोकसंख्येचे मोहित्यांचे वडगाव या गावानेही घरातील टीव्ही आणि फोनच रात्री सात ते साडेआठ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वांकडून पालन व्हावे म्हणून गावातील मंदिरावर भोंगाही बसवण्यात आला आहे.
कोल्हापूरमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील नूल या गावात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावातील सर्व टीव्ही मोबाईल हे संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहेत. रोज संध्याकाळी 7 ते 8.30 या वेळेत गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल बंद असतील. गावच्या सरपंच प्रियांका यादव यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.