गणेशोत्सवात 21 फुटी गणेशमूर्ती आणि नवरात्रोत्सवात 21 फुटी दुर्गामूर्ती पाहिलेल्या कोल्हापूरकरांना आता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामच्या 21 फुटी मूर्तीचे दर्शन घडणार आहे. निमित्त आहे रामनवमीचे. अवघ्या तीनच दिवसांवर आलेल्या या रामनवमीचे औचित्य साधून आयसोलेशन हॉस्पीटल, चिले कॉलनीतील श्रीराम तरूण मंडळाने खास बेळगावहून श्रीरामाची 21 फुटी मूर्ती बनवून घेतली आहे. आज मंगळवारी मंडळाने बेळगाव ते कोल्हापूर असा 127 किलो मीटरचा प्रवास करत मूर्तीला मंडळाजवळ आणले आहे. रामनवमी साजरी करण्यासाठी खास उभारलेल्या मोठ्या मंडपात मूर्तीला विराजमान केले आहे. सायंकाळी 7 वाजता मूर्तीचा स्थापना व अनावरण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यानंतर रामनवमीपर्यंत ही मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवली जाणार आहे.
सामाजिक उपक्रमांनी नावारूपाला आलेल्या या मंडळाची (कै.) गिरीश हिरेमठ यांनी 1973 साली साजरी झालेल्या रामनवमीच्यादिवशी मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिले कॉलनीत मंडळाची स्थापना केली. या वर्षापासून मंडळांने गणेशोत्सव साजरा करायला सुरूवात केली. एक सामाजिक उपक्रम म्हणून हिरमेठ यांनी मंडळाकडे जमणाऱ्या वर्गणीत पदरचे पैसे घालून गरजू मुलांना शालेय साहित्य वाटपासह विविध कार्य करायला सुरूवात केली. हिरेमठ यांच्या निधनानंतर मंडळाची जबाबदारी स्वीकारलेले लक्ष्मण पसारे यांनी सामाजिक कार्य सुरूच ठेवले.
वीस वर्षांपूर्वी मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुतार यांनी लोकवर्गणीतून मंडळाची नवीन वास्तू चिले कॉलनीत बांधली. या वास्तूत समाजातील गरीब मुलींचे विवाह मोफत लावून दिले गेले. गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्चही मंडळाकडून उचलला जाऊ लागला. या सगळ्या समाजकार्याच्या धामधुमीत रामनवमीदिनी मंडळाची स्थापना होऊनही आपण रामनवमी साजरी करत नाही, याचे शल्य मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोचत राहिले होते. सुतार यांनी 2007 साली रामनवमी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला. येथूनच मंडळाकडून रामनवमी साजरी करण्याची नवी परंपरा सुरू झाली. मंडळाने श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तीही तयार करून घेतल्या. त्यांचे प्रतिवर्षीच्या रामनवमीला मंडळ कार्यालयात पूजन केले जाऊ लागले. तसेच वर्षभर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मूर्तींची पूजा-अर्चाही केली जाऊ लागली.
याचबरोबर वार्षिक नियोजन करून मंडळाकडून रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिर, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र व शिधापत्रिका तयार करून देणे असे सामाजिक उपक्रम राबवले जाऊ लागले. महिलांसाठी स्पॉट गेम, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. या कार्याच्या डोलाऱ्याला लोकांची पसंती मिळू लागली. रामनवमीमध्ये फक्त चिले कॉलनीतीलच नव्हे आजबाजूच्या गरजू लोकांच्या पोटाला चार घास मिळावेत म्हणून मंडळाने महाप्रसादाला सुरूवात केली. आजवर मंडळाकडून 8 रामनवमी सोहळ्याला महाप्रसादाचे आयोजन केले. प्रतिवर्षी चार हजारावर लोक लाभ घेतला. गेल्या काही वर्षांपासून तर रामनवमी जवळ येऊ लागली की मंडळासह कॉलनीतील रामनवमीचा माहोल तयार होऊ लागतो.
यंदाच्या वर्षात मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. त्याची कुणकुण मंडळाला गेल्या गणेशोत्सवापासून लागली होती. याच गणेशोत्सवात यंदाच्या रामनवमीला श्रीरामाची पाच-दहा नव्हे तर तब्बल 21 फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे मंडळाने पक्के केले. शोधाशोध केली असता बेळगावातील मूर्तीकार रवी लोहार हे श्रीरामाची उत्तम मूर्ती बनवतात, असे मंडळाला कळले. त्यानुसार त्यांच्याकडे 4 महिन्यांपूर्वी श्रीरामाची 21 फुटी मूर्ती बनवण्यासाठीची ऑर्डरी दिली. त्यांनीही तीन महिने परिश्रम घेऊन बनवलेल्या मूर्तीने सौंदर्यासह विशेष रूप धारण केले आहे. ही मूर्ती आणण्यासाठी 80 कार्यकर्ते मोठ्या वाहनांसह बेळगावातील मूर्तीकार लोहारांकडे गेले होते. सोमवारी मध्यरात्रीच मूर्तीसह कार्यकर्त्यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले होते. तब्बल 127 किलो मीटरचा प्रवास करून मंगळवारी सकाळी 11 वाजता मूर्तीला मंडळाजवळ आणले आहे.
हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यांसोबत स्थापलेल्या श्रीराम तरूण मंडळाकडे आता अडीचशेवर कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे. या गोतावळ्यासह चिले कॉलनीच्या साक्षीने आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मंगळवार 28 रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण होत आहे. बुधवार 29 ला महिला व रामनवमीला ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.