राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली असून काल रात्री त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वतःचा याबाबत ट्विट करत माहिती दिली. मात्र, पण काल कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी शंभूराज देसाई त्यांच्या मरळी गावच्या श्री निनाईदेवीच्या यात्रेत सहकुटुंब सहभागी झाले होते. या यात्रेतील मिरवणुकीत शंभुराज देसाई यांनी गाण्याच्या तालावर ठेका देखील धरला होता. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आता खुद्द शंभूराजेंचं कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
पाटण तालुक्यातील मरळी गावच्या निनाईदेवीची यात्रा काल उत्साहात पार पडली. यावेळी गावच्या यात्रेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकुटूंब उपस्थिती लावली. यावेळी गावातील त्यांच्या घरासमोर पालखी येताच शंभुराज देसाईंनी सहकुटुंब ग्रामदेवता निनाईदेवीचे दर्शन घेतले. तसेच गुलालाची उधळण केली होती. त्यानंतर ग्रामस्थांसोबत पालखीसमोर जाऊन मंत्री देसाई यांनी गाण्यावर ठेकाही धरला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तथा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनीही गुलालाची उधळण करत ठेका धरला होता. मात्र, काळ रात्री उशिरा मंत्री देसाई यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांच्यावर साताऱ्यातील घरीच उपचार सुरू करून त्यांना विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करत सांगितले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृहविलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असं मी आवाहन करतो असे त्यांनी सांगितले.