गेल्या महिन्याच्या अवकाळीमधून ज्या शेतकऱ्यांची पिके वाचली होती ती देखील चालू महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे पूर्णतः वाया गेली आहेत. यामुळे आधीच बेजार झालेल्या बळीराजाला मोठा फटका बसला असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान आगामी काही दिवस राज्यात असंच हवामान राहणार असून अवकाळी पाऊस कायम राहणार आहे.
आज देखील महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 13 एप्रिल 2023 वार गुरुवार रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता देखील आयएमडीच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 13 ते 15 एप्रिल दरम्यान काही जिल्ह्यात गारपीटीची देखील शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट होणार असून विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यात आगामी काही दिवस पावसाचेच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक सजग आणि सतर्क राहायचे आहे. गारपिटीची शक्यता लक्षात घेता आपल्या पशुधनाची देखील काळजी घेण्याचे आवाहन यावेळी जाणकार लोकांच्या माध्यमातून केले जात आहे.