इचलकरंजी, शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली सुळकूड पाणी योजना राबविण्यासाठी इचलकरंजीकरांनी संयम बाळगला आहे. तर दुसरीकडे स्वतःला श्रावण बाळ समजणारे कागल तालुक्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या भडकाऊ विधानामुळे शहरवासियातून विशेषतः महिला वर्गातून प्रचंड संताप तसेच रोष व्यक्त केला जात आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विकास कामात आडवा पाय मारणारे मंत्री तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी राज्यांचा विकास काय करणार, अशी उपरोधिक टीका सामान्य नागरिकांतून केली जात आहे. सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अभ्यास करूनच सुळकूड पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.
शिवाय या योजनेमुळे कोणाच्याही हक्काच्या पाण्यावर गदा येणार नाही, याची जाणीव तसेच माहिती समस्त कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील सर्व आजी- माजी लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी आणि मंत्री महोदयांनाही आहे. तथापि केवळ आणि केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर या प्रश्नाचे भांडवल कसे करता येईल, याचाच प्रकार सध्या सुरू असल्याचे प्रकर्षाने दिसते. आजमितीला काहींना आपले पद टिकवण्यासाठी तर काहींनी पद स्थानिक नेत्यांनी मी पणा सोडण्याची गरज सुळकूड पाणी योजना राबविण्यासाठी शहरातील सर्वच पक्षाच्या आजी- माजी नेतेमंडळींनी एकजूट दाखविली आहे. तथापि आजही स्थानिक नेत्यांमध्ये प्रत्येक पातळीवर मी पणा नडताना दिसत आहे.
पाणी योजना राबविताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सध्या स्थानिक नेत्यांमधून केला जात आहे. पण तो वेळीच थांबविण्याची गरज असल्याची भावना सूज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूरकरांनी धरणातून पाणी आणले, तेव्हा कागल, राधानगरी तालुक्यातील नेत्यांनी विरोध केला नाही. मात्र इचलकरंजीसाठी सुळकूड दूधगंगा नदीतून पाणी आणले जात असताना विरोधाचे राजकारण का आणि कशासाठी? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकारी संस्था, दूध संघाच्या निवडणुकीत मतासाठी कागलच्या सर्व नेत्यांना इचलकरंजी आठवते. रोजगार, व्यापार उद्योगासाठी इचलकरंजी आठवते. इतकेच नव्हे तर नातेसंबंधही आठवतात, तेव्हा हेच लोकप्रतिनिधींनी मनाचा मोठेपणा दाखवताना दिसतात. मग इचलकरंजीला पाणी देण्यासाठी संकुचित भावना कशासाठी? अशी विचारणा सर्वस्तरातून होत आहे.
आज पाणी योजनेसाठी इचलकरंजी शहराला गरज आहे. भविष्यात विरोध करणाऱ्यांनाही कोणत्या ना कोणत्या विकास कामासाठी लगतच्या शहराची, गावची गरज नक्कीच भासणार, हे त्रिवार सत्य आहे. तेव्हा प्रत्येक विकास कामामध्ये विरोध करण्याऐवजी मंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी सामोपचाराने त्याचबरोबर वैचारिक पातळीवर प्रसंगी माणुसकीच्या भावनेने तो प्रश्न, समस्या सोडवण्याची अपेक्षा असते. पण जाणकार लोकप्रतिनिधींनीकडून मतांच्या राजकारणासाठी रक्तपाताची भाषा करणे दुर्दैवी आहे. इतकेच नाही तर गेल्या काही काळातील नेतेमंडळींची भाषणे पहाता राजकारणाची पातळी घसरल्याची भावना सामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.