देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जाताना मलिकवाड-नणदी रस्त्यावरील शर्यतीच्या माळाजवळ मोटारीने दुचाकीला समोरासमोर धडक (Road Accident) दिल्याने भाऊ-बहीण जागीच ठार झाले.प्रशांत नागराज तुळशीकट्टी (वय २०) आणि प्रियांका नागराज तुळशीकट्टी (वय १९) अशी ठार झालेल्या भाऊ-बहिणीची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सदलगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील प्रशांत आणि त्याची बहीण प्रियांका हे दोघे मोटारसायकलवरून चिक्कोडी येथील परटी नागलिंगेश्वर यात्रेनिमित्त दर्शनासाठी जात होते.
सदलगाहून जाताना मलिकवाड – नणदी रस्त्यावरील शर्यतीच्या माळाजवळ आलेल्या मोटारीने त्यांना धडक दिली. मोटारीने दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. मलिकवाड येथील दादासाहेब कोळी हे मुलग्यासह गोव्याहून नवी मोटार घेऊन येत होते. यावेळी गाव जवळ असतानाच त्यांच्या मोटारीला अपघात झाला.समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील बहीण व भाऊ उडून बाजूला फेकले गेले. मोटारीतील एअरबॅग उघडल्याने त्यातील दोघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. प्रशांत आणि प्रियांका हे सदलगा येथील हेस्कॉम कंत्राटदार नागराज तुळशीकट्टी यांची मुले आहेत. बहीण-भावाच्या अपघाती मृत्यूने सदलगामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.