Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरभीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या कोल्हापूरच्या दोन अल्पवयीन मुलांची हैदराबादमधून सुटका; पोलिसांनी 'असा'...

भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या कोल्हापूरच्या दोन अल्पवयीन मुलांची हैदराबादमधून सुटका; पोलिसांनी ‘असा’ रचला सापळा

येथील झोपडपट्टीतून भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुलांची पोलिसांनी दहा दिवसांनी हैदराबाद येथून सहीसलामत सुटका केली.हैदराबाद येथे रेल्वेस्थानकावर भीक मागताना त्या मुलांना आई-बाबांची आठवण आली, त्यांनी एका प्रवाशाकडील मोबाईलवरून घरी फोन केला, त्यानंतर मुलांचे लोकेशन निश्‍चित झाले व तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलांना ताब्यात घेतले.या मुलांचे अपहरण केलेल्या काजल सुधाकर सूर्यवंशी (वय ३५, रा. कनाननगर, कोल्हापूर) या महिलेला पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर आणि अपहरण झालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतून अपहरण झालेल्यांमध्ये एका अकरा वर्षांच्या मुलीचा आणि बारा वर्षांच्या मुलाचा समावेश होता.

दोघांचे अपहरण एका भीक मागणाऱ्या महिलेने केल्याचा संशय कुटुंबीयांनी २७ ऑगस्टला पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतून व्यक्त केला होता. तसेच संबंधित महिलेचे छायाचित्रही पोलिसांना दिले होते. अपहरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मिरज, गोव्यासह कोल्हापुरात त्यांचा शोध सुरू ठेवला होता.दरम्यान, आईची आठवण येत असल्यामुळे अपहरण झालेल्या मुलाने हैदराबाद येथे रेल्वे स्थानकावर एका प्रवाशास विनंती करून त्याच्या मोबाईलवरून घरी फोन केला. मात्र, अनोळखी नंबर असल्यामुळे तो उचलला नाही. पुन्हा त्या नंबरवर फोन केल्यानंतर लहान मुलाने हैदराबादहून फोन केल्याचे त्या प्रवाशाने सांगितले.

यावर कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती शाहूपुरी पोलिसांना (Shahupuri Police) दिली.पोलिसांनी त्या क्रमांकावर मुलाचे छायाचित्र व्हॉटस्‌ ॲपद्वारे पाठविले. तेव्हा त्या प्रवासी व्यक्तीने हाच मुलगा होता असे सांगितले. यानंतर हैदराबाद रेल्वेस्थानकाच्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेतला. त्यावेळी तेथील एका सिग्नलवर ही मुले भीक मागत असल्याची आढळली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कोल्हापुरातील पोलिसांशी आणि मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकांना तातडीने हैदराबादला बोलविले.दरम्यानच्या काळात शाहूपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, कॉन्स्टेबल लखन पाटील, विशाखा पाटील हे हैदराबाद येथे चौकशीसाठी पोहोचले. त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलांसह अपहरण करणाऱ्या महिलेलाही कोल्हापुरात आणले. महिलेला अटक केली असून, दोन्ही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवले असून कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्‍यात येणार आहे.दादा मला न्यायला ये… परत कोठे जाणार नाही…अल्पवयीन मुलीने हैदराबादमधून पोलिसांच्या फोनवरून बोलताना ‘दादा मला न्यायला ये…’ असे सांगितले. दरम्यान तिला सुखरुप येथील सुधारगृहात आणल्यावर भाऊ तिला प्रत्‍यक्षात भेटला तेव्हा तिने जवळ येऊन ‘परत कोठेही जाणार नाही…’ असे सांगितले. यावेळी तिचा कंठ दाटून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -