Monday, December 23, 2024
Homeअध्यात्मआज अंगारकी संकष्टी, जाणून घ्‍या तिचे माहात्म्य

आज अंगारकी संकष्टी, जाणून घ्‍या तिचे माहात्म्य

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आज मंगळवार, दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी संकष्टी. त्यानिमित्त… पौर्णिमेनंतर जी चतुर्थी येते, तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. अमावास्येनंतर जी चतुर्थी येते, तिला विनायकी चतुर्थी म्हटले जाते. संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी मंगळवारी येते, त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटले जाते. ही अंगारकी संकष्टी विशेष अशी आहे. सर्व संकष्टींमध्ये तिचे महत्त्व अधिक मानले जाते. ही अंगारकी संकष्टी कल्याणप्रद आणि शुभदायक अशी मानली जाते. त्यामुळे तिचे माहात्म्य अधिक मानले जाते. अंगारकी संकष्टीचा उपवास आणि व्रत भाविकतेने केले जाते.

मुदगल पुराणात अंगारकी संकष्टीचे माहात्म्य सांगणारी कथा आहे. त्यातून अंगारकी संकष्टीचा प्रारंभ कसा झाला, याची माहिती मिळते. मुदगल पुराणाप्रमाणे गणेश पुराणातही अंगारकी संकष्टीसंबंधीची कथा आहे.

मुदगल पुराण आणि गणेश पुराण यात सांगितलेली कथा अशी – वेदविद्या पारंगत, प्रख्यात गणेशभक्त भारद्वाज ऋषी हे अवंतीनगरीत वास्तव्यास होते. त्यांचा पुत्र अंगारक. आपल्या पुत्राला त्यांनी गणेशमंत्र दिला. गणेश उपासना करायला सांगितले. अंगारकाने अरण्यात जाऊन तपसाधना केली. त्याला श्री गणेश प्रसन्न झाले. त्यांनी या मुलाला – अंगारकाला दर्शन दिले. त्याला वर मागायला सांगितले.

तेव्हा अंगारकाने वर मागितला. त्रिखंडात माझे नाव प्रख्यात व्हावे. आज जी तिथी आहे, ती माझ्या नावाने विख्यात व्हावी. ती तिथी सर्वांचे कल्याण करणारी व्हावी. जे या तिथीला व्रताचरण करतील, त्यांचे मनोरथ आणि मनोकामना पूर्ण होवोत, असा वर त्याने श्री गणेशाकडे मागितला. तेव्हा श्री गणरायाने अंगारकाला वर दिला. तू भूमिपुत्र आहेस. म्हणून तुझे नाव आता भौम म्हणून प्रसिद्ध होईल. तुला नभांगणातील ग्रहमालेत स्थान मिळेल आणि मंगळ ग्रह म्हणून तो ग्रह ओळखला जाईल. तू लाल वर्णीय असल्याने अंगारक हे तुझे नाव वर्णाप्रमाणे रूढ होईल. आजच्या तिथीला अंगारकी असे संबोधन राहील आणि आज जे अंगारकी संकष्टीचे व्रत करतील, ते ऋणमुक्त होतील आणि या व्रताचरणाने भक्तांचे कल्याण होईल, असे वरदान आणि आशीर्वाद श्री गणेशाने अंगारकाला दिले.



अंगारकी संकष्टीचे व्रत करणार्‍या भक्ताला एकवीस संकष्टी केल्याचे पुण्य मिळेल, असेही वरदान श्री गणेशाने अंगारकाला दिले. श्री गणेशाच्या या वरदानाने अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या कथेमुळे नवग्रहातील मंगळ ग्रहाला अंगारक असेही नाव मिळाले असून, भौम नावानेही हा ग्रह ओळखला जातो. मंगळ ग्रह ऋणमोचक मानला जातो व मंगळाचे ऋणमोचक स्तोत्रही प्रसिद्ध आहे. असा हा अंगारकी संकष्टीचा महिमा आहे. या व्रतादिवशी सकाळपासून उपोषण करावे. सायंकाळी चंद्रोदयानंतर श्री गणेशाची षोडशोपचाराने पूजा करावी. पूजाविधीत दूर्वा आणि लाल फुले श्रद्धापूर्वक अर्पण करावीत. गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष यांचे पठण करावे. पूजेनंतर आरती, मंत्रपुष्पांजली झाल्यावर 21 उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा, नंतर कुटुंबीयांसमवेत आनंदाने भोजन करावे. अशाप्रकारे हे व्रत करावयाचे आहे.


अंगारकी संकष्टीस शक्य असल्यास श्री गणेश मंदिरात यथाशक्ती अभिषेक करावा. सुखकर्त्या, दु:खहर्त्या गणेशाची मनोभावे प्रार्थना करावी. सर्व संकष्टींमध्ये अंगारकी संकष्टी श्रेष्ठ असल्याने या संकष्टीला मनोभावे केलेल्या प्रार्थनेचे फळ विनाविलंब प्राप्त होते, असे शास्त्र सांगते. अंगारकी संकष्टीच्या व्रताने सर्व संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, कामकाजातील अडथळे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेचा प्रत्यय निश्चितच येतो, असा अनुभव असल्याची भाविकांची भावना आहे.






RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -