इचलकरंजी
शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्वच विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्राची कार्यवाही लवकरात लवकर करुन विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे प्रमाणपत्र तातडीने मिळावे अशी मागणी ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथील समाज कल्याण विभागाचे उपायुक्त उमेश घुले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चालू शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून अभ्यासक्रमांत आरक्षित जागेवर प्रवेशासाठी तसेच अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्काची प्रतीपूर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विज्ञान शाखेतील असे विद्यार्थी वेळेत पडताळणीचे प्रमाणपत्र महाविद्यालयातकडे सादर करु शकले नाहीत तर ते शासकीय सवलतींपासून वंचित राहू शकतात. त्यांची अडचण लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांना जात पडताळणीच्या प्रमाणपत्र लवकर मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखालील ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या वतीने श्री. घुले यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. श्री. घुले यांनीही या संदर्भात लवकरात लवकर पूर्तता करण्याची ग्वाही दिली.
शिष्टमंडळात ताराराणी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे, इचलकरंजी शहराध्यक्ष फहिम पाथरवट, तळंदगे शहराध्यक्ष तुषार बाणदार, भगवान लाखे, अमोल कांबळे, गायत्री कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.