पलटूराम म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कधी कोणत्या पक्षाशी युती करतील आणि कधी तोडतील हे सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीची स्थापना करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजवलेल्या नितीश कुमार यांनी निवडणुकीला काही दिवस बाकी असताना लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी युती तोडत पुन्हा भाजपबरोबर घरोबा केला आणि एनडीएमध्ये सहभागी झाले.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्वबळाबर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे चंद्राबाबू नायुडू यांच्या तेलगू देसम आणि नितीश कुमारांच्या संयुक्त यांच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान झाले.
परंतु, आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टेन्शन वाढले आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे माजी सहकारी आणि लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र यांनी दावा केला आहे की, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार आहेत. त्यानंतर भाजपचा साफ होईल. भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नितीश इंडिया आघाडीत परतणार आहेत. यानंतर बिहारमध्येही भाजप शिल्लक राहणार नाही.”
या दाव्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीत परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास बिहारमध्ये भाजप कमकुवत होऊ शकते. बिहारमधील सत्ताही भाजपच्या हातून निसटू शकते. इतकेच नव्हे तर केंद्रातील एनडीए सरकारही अस्थिर होऊ शकते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या. यात भाजपने सर्वाधिक 240 जागांवर विजय मिळवला. तर एनडीएमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या तेलगू देसम पक्षाला 16 आणि संयुक्त जनता दलाला 12 जागी विजय मिळाला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर आहे. या दोन्ही नेत्यांपैकी एकाने जरी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तर मोदी सरकार कोसळू शकते. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंची मर्जी भाजप कशी राखतेय त्यावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील इंडिया आघाडीनेही दमदार कामगिरी करत 235 जागा मिळवल्या. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 99 तर दुसऱ्या स्थानी असलेल्या समाजवादी पक्षाने 37 जागा मिळवल्या आहेत.
अशा परिस्थितीत इंडिया आघाडीला सरकार स्थापनेसाठी आणखी 37 जगांची गरज आहे. जर नितीश कुमारांनी वेगळा निर्णय घेतला तर आणखी काही छोटे पक्ष आणि अपक्ष खासदार इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात.