इचलकरंजी –
प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागासाठी 1 रुपया वीज सवलतीसाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्याचे त्याचबरोबर या सवलतीचा लाभही तातडीने देण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंग यांना दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात सांगितले. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून यंत्रमागधारकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील अनेक वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय नानाविध अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. या व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य शासनाकडून 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागासाठी 1 रुपयांची वीज सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने यंत्रमागधारकांच्या अडचणी वाढतच होत्या. शिवाय वीज सवलत मिळण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने ऑनलाईन नोंदणीची अट घातली होती. ती प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने ती रद्द करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन वीज सवलतीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. याच संदर्भात सोमवारी झालेल्या अधिवेशनात आमदार आवाडे यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करुन यंत्रमाग व्यवसायाला व त्यातील घटकाला न्याय द्यावा अशी मागणी केली होती.
मंगळवारी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वीज सवलतीच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधत या सवलतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी लावून धरली. तोच धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनात बोलताना वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिवांना दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर सवलतीचा लाभही तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात विशेषत: यंत्रमाग व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे.