सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसात गरमा गरम भजी खायची खूप इच्छा होते. आपण आवडीने अनेकदा कांदा, बटाटा किंवा मिरची भजी खातो. पण मूग डाळीची भजी खायला खूप पौष्टिक आणि चविष्ट देखील असतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
मूग डाळीची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. १ वाटी मूग डाळ२. २ कांदे बारीक चिरलेले३. ५-६ हिरव्या मिरच्या चिरलेल्या४. १ चमचा लाल तिखट५. १ चमचा गरम मसाला६. २ चमचे आलं- लसूण पेस्ट७. २ चमचे कसुरी मेथी८. मीठ चवीनुसार१०. तेल आवश्यकतेनुसार
मूग डाळीची भजी बनवण्याची कृती:
१. सर्वप्रथम मूग डाळ जवळपास ४ तास भिजत घालून गाळून घ्या.
२. त्यानंतर मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. डाळ जास्त बारीक करू नका.
३. एका भांड्यात बारीक केलेली डाळ काढा आणि त्यात कांदा, मिरच्या, लाल तिखट, गरम मसाला, कुसरी मेथी, आलं-लसूण पेस्ट, मीठ हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा.
४. दुसरीकडे गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात तेल ओता.
5. तेल तापले की गॅसची आच मध्यम ठेवून मिश्रणाची भजी बनवून तेलात टाका.
६. ही मूग भजी दोन्ही बाजूंनी तेलात व्यवस्थित तळून घ्या.
७. लालसर रंग येईपर्यंत सर्व भजी तळून घ्या आणि सॉससोबत सर्व्ह करा.