Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रआई पाठीशी नसती तर आजचा दिवस दिसलाच नसता… परिस्थितीवर मात करून सीए...

आई पाठीशी नसती तर आजचा दिवस दिसलाच नसता… परिस्थितीवर मात करून सीए बनला, आईचे ऋण नाही विसरला.. !

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे जग धावत असतं, त्याच्या यशाचं त्यांना अप्रूप असतं पण त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत, त्यांची जिद्द ही फारच कमी लोकांना माहीत असते. अंगात जिद्द असेल तर काहीही करून दाखवता येतं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे… हे वाक्य किंवा म्हण अनेकांनी ऐकलं असेल पण ते खरं करून दाखवणार, ते सार्थ ठरवणारे फारच कमी असतात.

 

ही म्हण सार्थ ठरवणारा एक तरूण सध्या बराच गाजतोय. डोंबिवलीमध्ये राहणारा, एका भाजीविक्रेत्या आईच्या पोटी जन्म घेतलेला, अत्यंत गरिबीत लहानपण घालवलेला योगेश ठोंबरे आणि त्याची आई नीरा हे दोघेही आज डोंबिवलीकरांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. देशातील अत्यंत अवघड समजली जाणारी, अवघी १-२ टक्के निकाला लागणारी सीएची परीक्षा पास करून योगेशने घवघवीत यश मिळवलंय. आणि या यशात फक्त त्याचा वाटा नाही तर सतत कष्ट करून, रक्ताचं पाणी करून मुलाला शिकवणारी, त्याच्या मागे पहाडासारखी खंबीरपणे उभी राहणारी त्याची आई नीरा यांचाही महत्वाचा वाटा आहे. आणि आईच्या याच कष्टायची, त्यांच्या मुलालाही जाणीव आहे.

 

निरा ठोंबरे या कल्याणजवळच्या खोणी गावात राहतात. पतीनिधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. विशेष म्हणजे तीन मुलांचे संगोपन त्यांनी केले. मुलीचे लग्नही लावून दिले आणि आता त्यांच्या धाकट्या मुलाने अतिशय अवघड समजली जाणारी सीएची परीक्षा क्रॅक केली आहे. परीक्षा पास झाल्यानंतर योगेश आईला भेटायला आला आणि भाजी विक्री करणाऱ्या आईला घट्ट मिठी मारली. त्यांच्या प्रेमाचा हा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या यशामुळे चहूकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

 

आई पाठीशी नसती तर हा दिवस दिसला नसता

 

मी ही परीक्षा पास झालो खरा, पण माझ्या मेहनतीपेक्षा माझ्या आईची मेहनतच खरंतर फळली आहे. कारण मी कितीही अभ्यास केला असला तरी, जर माझ्या आईचा मला सपोर्ट नसता, ती जर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली नसती मला आजचा हा दिवसच दिसला नसता, असे सांगत योगेश ठोंबरेने यशाचे संपूर्ण श्रेय आईला दिले.

 

मी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच तिनेही घेतली आहे. परीक्षेची तयारी जेव्हा मी करत होतो, त्यावेळेस १२-१३ एकाच जागी बसून अभ्यास करायचो. नंतर एवढा थकायचो की जागेवरून हलायचंही त्राण नसायचं. तेव्हा आई माझ्या जवळ यायची, डोक्यावर हात फिरवून विचारपूस करायची, फ्रेश वाटावं म्हणून चहाचा कप आणून द्यायची. तिला लिहीता-वाचता यायचं नाही पण तरीही कधीतरी ती प्रश्नपत्रिका घेऊन बघायची. असे अनेक क्षण आठवत असतात, असे तो म्हणाला.

 

मराठी माध्यमातून आल्याने भीती होती पण..

 

सीए बनण्याचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता, असं योगेशने सांगितलं. अनेकवेळा वाटायचं की हे जमेल की नाही. कारण माझं शिक्षम मराठी माध्यमातून झालं आहे, त्यामुळे थोडी भीती होती मनात. एवढा अभ्यास इंग्रजीतून करायचा कसा, त्याचं दडपण होतंच. वाचलेलं सगळं समजलं तरी ते पेपरमध्ये लिहायचं कसं, कागदावर कसं उतरवायचं हाही प्रश्न होताच.

 

एवढंच नव्हे तर आमची आर्थिक परिस्थिती देखील हलाखीची होती. वडील असताना किंवा ते गेल्यावरही आम्ही खूप कष्टाने दिवस काढलेत. सोनं, दागिने विकण्याची देखील वेळ आली होती. काही रकमेसाठी कर्जही काढावं लागल्याचं सांगताना योगेश भावूक झाला होता.

 

एंट्री सोपी पण एक्झिट कठीण

 

सीएची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी असते. त्यात कधी, किती यश मिळेल याची कोणालाच गॅरेंटी नसते. रिझल्ट काय लागेल हे कोणालाही माहीत नसतं, जे रँकर असतात त्यांनाही कल्पना नसते की त्यांना रँक मिळू शकतो. आणि मी जेव्हा सीए करण्याचं ठरवलं तेव्हा कॉलेजमधल्या प्रोफेसरनीही आम्हाल सांगितलं होतं की इथे ( सीए करताना) एंट्री खूप सोपी आहे पण एक्झिॉट ( यशस्वी होऊन बाहेर पडणं) खूप कठीण आहे. सो त्या सर्वांची कल्पना होतीच , पण मला आधीपासूनचे हे करायचं होतंच , त्यामुळे एकदा उतरलो ते ठाम निश्चय करूनचं. काहीही झालं तरी हार मानायची नाही हे ठरवलं होतं, मग त्याप्रमाणेच अभ्यासाचं , खर्चाचं नियोजन करत गणित मांडलं, असंही योगेशने सांगितलं.

 

मात्र असं असलं तरी अखेर आज त्याच्या अपरिमित कष्टांना यश मिळालं आहे. महत्वाची परीक्षा पास होऊ आज तो सीए बनला आहे आणि त्याचा आनंद त्याच्या आणि आईच्या चेहऱ्यावरही झळकत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -