बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये भाऊच्या धक्क्यावर मोठा ट्विस्ट आला आहे. जान्हवी किल्लेकर हिला बिग बॉसच्या घरातील तुरुंगात टाकण्यात आलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण ढवळून निघालं आहे. जान्हवीला तुरुंगात टाकल्यानंतर आता अभिनेते रितेश देशमुख यांनी निक्की तांबोळीलाच तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. तुम्ही या घरात ज्या पद्धतीने वागत आहात, त्यामुळे तुम्ही तुरुंगात तर जालच पण या घरातूनही बाहेर जाल, असा इशाराच रितेश देशमुख यांनी दिला आहे. तसेच निक्कीला गेम सुधारण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे निक्की तुरुंगात जाणार का? बिग बॉसमध्ये पुढे काय होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर आधी जान्हवी किल्लेकर आणि नंतर निक्की तांबोळी यांना चांगलेच धक्के दिले. तसेच इतर सदस्यांनाही चांगल्याच कानपिचक्या दिल्या. जान्हवी किल्लेकरला रितेश यांनी तुरुंगात टाकण्याची शिक्षा दिली. त्यानंतर घरातील कॅप्टन म्हणून जान्हवीला तुरुंगात टाकण्याचे आणि तुरुंगाचे लॉक अप लावून घेण्याचे आदेश रितेश यांनी निक्कीला दिले. पण यानंतर बोलताना एक वाक्य वापरलं त्यामुळे निक्कीच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. जान्हवीला आताच्या आता जेलमध्ये टाका. जेलला एक लॉक आहे. लॉक करा. हे जेल आहे ना ते नीट पाहा. ज्या प्रकारे तुम्ही खेळताय ना, पुढचा नंबर तुमचाच असेल, असं रितेश यांनी निक्कीला सांगितलं. त्यावर निक्कीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. निक्कीने आपल्या सहकाऱ्याला याविषयी बोलूनही दाखवलं आहे. सर म्हणतात नंतर तुरुंगात जाण्याची माझी बारी आहे, असं निक्की म्हणाली. त्यावरून निक्की किती घाबरलीय हे दिसून येत आहे.
गेल्यावेळी मी बोलत होतो तेव्हा कुणाच्या चेहऱ्यावर हास्य, कुणाचे डोळे इकडे तिकडे होते. अरबाजचे कॉमेंट करत होता. अरबाज वर बघ, मी रितेश देशमुख आहे. मला हलक्यात घेऊ नका. तुझ्याकडे मी नंतर येतो. निक्की जेलमध्ये तुझा नंबर लागेल असं का म्हणालो माहीत आहे? या आठवड्यात तुम्ही अनेक गोष्टी केल्या. पॅडी भाऊंना काय म्हणाला तुम्ही? पॅडी भाऊंना तुम्ही म्हणाला जोकर… असं रितेश यांनी म्हणताच निक्कीने त्याला उत्तर दिलं. ते फनी फनी करत होते सर म्हणून मी त्यांना जोकर म्हटलं. त्यावर जोकर म्हणजे काय? हे तुला माहीत आहे का? असा सवाल त्यांनी निक्कीला केला.
मी रागात बोलत होतो…
रितेश यांनी सवाल केल्यानंतर सर्वांना जे हसवतात ते जोकर, असं निक्की म्हणाली. त्यावर पंढरीनाथ कांबळी यांनी स्पष्टीकरण दिलं. मी यांना हसवण्यासारखी कोणतीही गोष्ट केली नव्हती. आमची मस्करी आमच्या ग्रुपमध्ये करतो. आपण एखाद्याला जोकर रागात बोलतो. मी त्यांना रागाने बोलत होतो. त्यात कोणतीही फनी गोष्ट नव्हती. मला भीक नको फळं हवीत असं म्हणत होतो. त्यामुळे जोकर म्हणण्याचा सवाल येतोच कुठे? असा सवाल पंढरीनाथ कांबळे म्हणाले.