राज्यात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांना धमकावण्यासाठी एका अल्पवयीन प्रेमवीरानं गावठी पिस्तुलाचा वापर केला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याला पिस्तूल पुरवणाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे.
ऋतुराज दत्तात्रय भिलूकडे असे आरोपीचे नाव असून, तो माजी उपसरपंचांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानेच आरोपी मुलाला पिस्तूल पुरवल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचे एका मुलीवर प्रेम होते. प्रेयसीच्या कुटुंबाला धमकावण्यासाठी प्रियकराने पिस्तूलीचा वापर केल्याची माहिती आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ आरोपींना अटक केली. तसेच गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पिस्तुलाचा वापर यापूर्वी इतर कोणत्या घटनांमध्ये झाला आहे का, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती आणि हिंसक वर्तन चिंतेचा विषय बनला असून, या घटनेने पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.