42 लेकराचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करणार्या क्रूरकर्मा रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींचे भवितव्य येत्या काही दिवसांत ठरणार आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यासाठी या बहिणींनी 2014 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील अंतिम सुनावणी नुकतीच पूर्ण झाली.आपल्या दया याचिकेवर अन्यायकारक विलंब केल्याचा दावाही दोघींनी केला आहे. त्यामुळे आपणाला प्रचंड मनःस्ताप झाला आणि जगण्याच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार, सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
1996 मध्ये कोल्हापुरात 14 लहान मुलांचे अपहरण करून त्यापैकी पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी रेणुका शिंदे, सीमा गावित आणि त्यांची आई अंजना गावित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी अंजना गावितचा काही वर्षांपूर्वी कारागृहात मृत्यू झाला. 2001 मध्ये दोघी बहिणींना न्यायालयाने दोषी ठरवले. 2004 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनाविली. 2006 मध्ये सुप्रीम कोर्टानेही त्यांची फाशी कायम केली. 22 ऑक्टोबर 1996 पासून दोघीही कोठडीत आहेत. 2014 मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.