सराईत गुन्हेगार श्रावणेशनाथ महावीर चौगुले (वय 29, सध्या रा. सिद्धिविनायक पार्क, शिवशक्तीनगर कुपवाड, मूळ गाव भोसे, ता. मिरज) याचा रविवारी रात्री मिरज एमआयडीसीलगत असलेल्या शिवशक्ती नगरमधील भाड्याच्या खोलीत त्याच्या दोन मित्रांनी खून केला.
तशी तक्रार त्याच्या नातेवाईकांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोफ्या व अशोक मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांची पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसे (ता. मिरज) येथील श्रावणेशनाथ हा आठ महिन्यांपासून मिरज एमआयडीसीलगत असलेल्या शिवशक्तीनगरमधील सचिन माने यांच्या खोलीत भाड्याने एकटाच राहात होता. त्याच्या दोन मित्रांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात कारणावरून त्याच्या छातीवर, डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी कुपवाड पोलिस व सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस, अशी दोन पथके रवाना झाली आहेत.