गेल्या दोन-तीन दिवसांपासून बांगलादेश आणि भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळाच तणाव पाहायला मिळत होता. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आयपीएल खेळणार की नाही, यावरून दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये वाद रंगला होता.
अखेर बीसीसीआयच्या आदेशानंतर मुस्तफिजूर रहमानला IPL 2026 मधून वगळण्यात आलं आहे. (T20 World Cup)
भारत आणि बांगलादेशमधील राजकीय वातावरण सध्या तणावपूर्ण आहे. त्याच पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) टी-20 विश्वचषकासाठी भारतात खेळायला नको, अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती. मात्र आता बांगलादेशने T-20 विश्वचषक 2026 साठी आपला संघ जाहीर केला आहे, आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
या विश्वचषकासाठी लिटन दासकडे कर्णधारपद देण्यात आलं असून मोहम्मद सैफ हसन उपकर्णधार असतील. बांगलादेशचा संघ गट ‘C’ मध्ये आहे. गट टप्प्यातील चार सामन्यांपैकी तीन सामने कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर, तर एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
या संघात तन्झीद हसन, मोहम्मद परवेझ हुसेन इमन, तौहिद हृदयॉय यांसारख्या तरुण खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. लिटन दाससाठी कर्णधारपद नवं नाही. त्याने आतापर्यंत 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं असून, त्यापैकी 15 सामने जिंकले आहेत, 13 पराभव झाले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.
सध्याच्या परिस्थितीत ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे, कारण अलीकडे बांगलादेशमधील घडामोडींमुळे अनेक वाद निर्माण झाले होते.
बांगलादेशचा टी-20 विश्वचषक 2026 संघ
लिटन दास (कर्णधार), मोहम्मद सैफ हसन (उपकर्णधार), तन्झीद हसन, मोहम्मद परवेझ हुसेन इमन, तौहिद हृदयॉय, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शके महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, तन्झीम हसन सकीब, तस्कीन अहमद, मोहम्मद शैफुद्दीन आणि शोरीफुल इस्लाम.
दरम्यान, काही वृत्तांनुसार बीसीबी भारतात होणारे सामने श्रीलंकेत हलवण्याचा विचार करत आहे. केकेआरकडून मुस्तफिजूर रहमानला सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीबी नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की इतर संघांची हॉटेल्स आणि संपूर्ण व्यवस्था आधीच ठरलेली असल्याने वेळापत्रक बदलणं जवळपास अशक्य आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे टी-20 विश्वचषकाच्या आधीच भारत-बांगलादेश क्रिकेट संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.






