इचलकरंजी येथील सावली सोसायटीमध्ये बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी १ लाख २० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संदीप पितांबर शिंदे (वय ४२) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संदीप शिंदे हे फाँड्रीत कामाला असून ते सावली सोसायटीत कुटुंबासह राहण्यास आहेत. १६ ते ३० जून या कालावधीत चोरट्यांनी शिंदे यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले ६० हजाराची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा १ लाख २० हजाराचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला. घरात चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्याने संदीप शिंदे यांनी शहापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.




