धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला संततधार पाऊस आणि धरणातून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात पंचगंगा नदीच्या पातळीत साडेतीन फुटांनी वाढ झाली आहे. पाणी जुन्या पुलाला लागुन वाहत असल्याने बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून या पुलावरील वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद करण्यात आली आहे.
धरणे पूर्ण क्षमतेने भरत आल्याने रात्रीतून धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने पुन्हा संततधार बरसण्यास सुरुवात केली आहे. धरणेही पूर्ण क्षमतेने भरत चालल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता जुन्या पुलाला लागुन पाणी बाहु लागल्याने महानगरपालिका प्रशासनाने जुन्या पुलावर बरैकेटस लावुन हा पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. परिणामी कागल, हुपरी मार्गावरील वाहतुक मोठ्या पुलावरुन सुरु आहे.
नदी काठावरील स्मशानभूमीच्या वाहन पार्कीगमध्ये पूराचे पाणी आले असून २४ तासात साडेतीन फुट पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे सायंकाळी पाणी पातळी ५६.२ फुटांवर पोहचली
होती. धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून धरणे भरत आल्याने रात्रीतून पाण्याचा विसर्ग वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नदी काठावर अग्निशमन दल, यांत्रिक बोटीसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.


