काही दिवसांपूर्वी ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीदरम्यान 22 फूट उंच गणेशमूर्ती कोसळली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. काही जण जखमी झाले होते. मागच्या महिन्यात ही घटना घडलेली. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. काल रात्री धारावीत गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान अपघात झाला. धारावीतील प्रेमनगर येथील ओम शक्ती फाउंडेशनची 15 फुटांची गणेशमूर्ती बैल बाजार, व्ही.बी. नगर येथून येत होती. शीतल तलावाजवळील स्पीड ब्रेकरवरून ट्रॉली नेत असताना गणेशमूर्ती ट्रॉलीवरून खाली पडली.या दुर्घटनेत गणेशमूर्तीचे नुकसान झाले. नुकसान झालेली गणेशमूर्ती शीतल तलावात विसर्जित करण्यात आली.
ट्रॉलीजवळ असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी व्यक्तीवर भाभा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. धारावीतील गणेश मंडळच्या गणपती आगमन दरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेत 2 जण जखमी झाले. एकाला कुर्ला भाभा रुग्णालयात तर दुसऱ्याला हबीब रुग्णालयात उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. यात संतोष जैस्वाल (28 ) आणि रोहित जैस्वाल ( 25 ) हे दोघे जखमी झाले होते.
ओम शक्ती फाऊंडेशन, प्रेम नगर, धारावी, व्ही. बी. नगर येथील बैल बाजारमधून १५ फूट उंचीची गणेश मूर्ती खाली कोसळल्याने परिसरात तणाव निर्माण झालेला. शीतल तलावाजवळ स्पीड ब्रेकरवरून मूर्ती घेऊन जाणारी ट्रॉली ओढत असताना, गणेश मूर्ती ट्रॉलीवरून खाली कोसळली. मूर्तीचं शीतल तलावात विसर्जन करण्यात आलं. ट्रॉलीजवळ असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली.भाभा रुग्णालयात त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या घटनेसाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.
मूर्तीचं बॅलन्सिंग खूप महत्वाचं
ओम शक्ती फाउंडेशनची गणेश मुर्ती कशी कोसळली? त्यामागे नेमकं काय कारण आहे ते अजून स्पष्ट नाहीय. मुंबईत सध्या अनेक मंडळ मोठ्या गणेशमूर्ती बनवण्याला प्राधान्य देतात. यात मूर्तीचं बॅलन्सिंग खूप महत्वाचं असतं. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात, अशावेळी गणेशमूर्तीची ट्रॉली ओढताना खूप काळजी घ्यावी लागते. मुंबईत गणेशमूर्ती कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. गणेशोत्सव येत्या 14 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मुंबईत महिना-दीडमहिना आधीच गणेशमुर्ती मंडपात आणल्या जातात.
