कोरोना चाचणीसाठी गेलेल्या एका तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेणाऱ्या एका आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अल्केश अशोकराव देशमुख (३२, रा. पुसदा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ जुलै २०२० रोजी दुपारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मोदी ट्रामा केअर रुग्णालयात घडली होती.
पीडित तरुणी काम करणाऱ्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमधील एक कर्मचारी २४ जुलै २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे स्टोअरमधील २० कर्मचाऱ्यांना २८ जुलै रोजी दुपारी बडनेरा येथील मोदी ट्रामा केअर हॉस्पिटल येथे कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. येथे अल्केश देशमुख हा प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता.
त्याच्याकडे तोंडाद्वारे स्वॅब घेण्याची जबाबदारी होती. यावेळी अल्केशने तरुणीसह तिची मैत्रिण व इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले. त्यानंतर त्याने पीडितेला तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता गुप्तांगाद्वारे स्वॅब घेऊन टेस्ट करावी लागेल, असे सांगितले.