सैन्यदलात जाण्यासाठी अनेक तरूणांनी भरतीपूर्व तयारी केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया बंद आहे. कोरोना संकटाचे सावट कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारने सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असणा-या तरूणांना दिलासा द्यावा. तसेच भरती अभावी संधी गमावलेल्या युवकांना खासबाब म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी अग्रणी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.
खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत नियम 377 नुसार तातडीचे व लोकहितासाठी महत्वाचे मुद्दे सादर करून ते सभागृहांच्या पटलावर ठेवले. त्यानुसार खा.पाटील यांनी म्हटले आहे, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती बंद आहे. विशेषत: सातारा जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा असून ती परंपरा आजतागायत सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. येथील बहुतांश युवक सैन्यदलात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी ते दोनदोन वर्षे अगोदर शारीरिक व अन्य परिक्षेची तयारी करत असतात. सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरूण त्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र कोरोनाने ओढावलेल्या परिस्थितीमुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत आहे. परिणामी त्यांची आलेली संधी हुकत असून त्यांचे स्वप्न हिरावून जात आहे.
देशातील कोरोना महामारीचा प्रभाव आता कमी झाला आहे. माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघात अशी अनेक गावे आहेत जिथे प्रत्येक घरातील तरुण देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगतो. परंतु भरती प्रक्रियाच बंद असल्याने त्यांचे हे प्रयत्न धूळीस मिळत आहेत. याशिवाय कोरोनामुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित झाल्याने वयाच्या मर्यादत आलेल्या इच्छुक तरूणांची संधी हुकली आहे. त्यांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न धोक्यात येत आहे.
अशा युवकांचे भविष्य, त्यासाठी ते घेत असलेले परिश्रम व त्यांची संपत चाललेली वयोमर्यादा लक्षात घेता भारत सरकारने खासबाब म्हणून अशा युवकांसाठी भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी देखील खा. श्रीनिवास पाटील यांनी केली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या सैनिक भरती प्रक्रियेबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह व चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत यांची भेट घेऊन खा. श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी देखील ही मागणी केली होती.