देशामध्ये दरवर्षी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र सरकार वार्षिक अनुदान देत असते. आता देशातील 12.50 कोटी लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याच्या येण्याची वाट पाहत आहेत. योजनेचा 11 वा हप्ता बँक खात्यात कधी येणार याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु एप्रिल ते जुलै दरम्यान 11 वा हप्ता येणे अपेक्षित आहे.
यासोबतच, शेतकऱ्यांसाठी मोठी माहितीही समोर येत आहे की, पीएम किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित असे काही लाभार्थी आहेत कि ते योजनेस अपात्र असूनही लाभ घेत आहेत. म्हणून अशा लोकांना लाभ घेण्यापासून थांबविण्याचं काम केंद्र सरकार लवकरच सुरू करणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, आता केंद्र सरकारमार्फत 1 मे ते 30 जून या कालावधीत सोशल ऑडिट करण्यात येणार असल्याचं कळतंय. या ऑडिटमध्ये ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र व अपात्र लोकांची माहिती घेतली जाणार जाणार आहे. याबाबतचा आदेश कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी जारी केला आहे.
प्रत्येक गावातील ग्रामसभेतुन अपात्रांची नावे घेऊन त्यानुसार ती पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीतून काढून टाकली जाणार आहे. या कामास आणखी काही वेळ जाऊ शकतो. अपात्र लोकांच्या जागी पात्र लोकांची नावे जोडली जाणार आहेत. त्यामध्ये मृत व्यक्ती, एकाच कुटुंबातून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची नावेसुद्धा लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येतील. अशा दोन वेगवेगळ्या याद्या करून त्यामधील अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे. यामुळे अशा लोकांना आता पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. सोशल ऑडिट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.
पीएम किसान पोर्टलवरील अद्ययावत माहितीनुसार, केंद्र सरकारने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता 31 मे 2022 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. जर तुम्हीही ही प्रक्रिया केली नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे नजीकच्या CSC सेंटरला आजच भेट द्या आणि माहिती घेऊन eKYC करून घ्या. जर तुम्ही पीएम किसान योजनेंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी केली असेल तर तुम्हाला कागदपत्रांची व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे काम अजून केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिक माहीतीसाठी https://www.pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती घ्या. याशिवाय काही समस्या असल्यास तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्प लाईन नंबरवर संपर्क शकता – 155261 / 011-24300606