भरघोस परतावा देण्यासाठी आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास लावून, २१ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी पतीपत्नीवर गुन्हा दाखल. निलेश रामकुमार पाटील, पूर्वा निलेश पाटील (रा. जुना बुधवारपेठ) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी ललिता राजेंद्र मांगलेकर (वय ५६, रा. मंगळवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयीत निलेश पाटील हा स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा डायरेक्ट आहे. ऑक्टोंबर २०१७ मध्ये त्याने राजेंद्र मांगलेकर व त्यांची पत्नी ललिता मांगलेकर यांची भेट घेतली. तुम्ही शेअर मार्केटमध्ये(Stock market) गुंतवणूक करा. तर दर महिन्याला दीड टक्के परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवले. जास्त परतावा मिळेल या आशेने मांगलेकर दाम्पत्याने २१ लाखांची गुंतवणूक केली. एप्रिल २०१९ अखेर फिर्यादी यांना परतावा मिळाला. मात्र त्यानंतर परतावा देणे बंद केले.
राजेंद्र मांगलेकर यांनी संशयित निलेश पाटील याची वेळोवेळी भेट घेऊन पैशाची मागणी केल्यानंतर पुन्हा २.५ टक्के परतावा देतो असे सांगून करार करून दिला. काही महिने परतावा दिली व नंतर देणे बंद केले. पैसे परत मागण्यासाठी तगादा लावल्यानंतर संशयीत निलेश पाटील याने वडणगे येथील विकलेला प्लॉट करार करून मांगलेकर यांना दिला. अशा प्रकारे दोन वर्षाच्या कालावधीत पाटील दाम्पत्याने २१ लाखांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद ललिता मांगलेकर यांनी पोलिसात दिली आहे. पो. नि. दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पुढील तपास करत आहेत.