केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारदरम्यानचा तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अटकेसंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला अहवाल मागितला आहे. २४ तासांच्या आत हा अहवाल सादर करण्याचे निर्देशदेखील राज्य सरकारला देण्यात आले आहे.
यापूर्वी राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांना पत्र लिहून मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात केलेल्या अटकेच्या कारवाईला अवैध ठरवले होते. पोलिसांनी कोठडीत अमानवीय व्यवहार केल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.राणा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्राच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तसेच मुख्य सचिवांना पत्र पाठवून याप्रकरणाची माहिती मागवून घेतली आहे.
पोलीस महासंचालकांकडून तयार करण्यात येणार अहवाल मुख्य सचिवांमार्फत केंद्राकडून पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी राणा यांनी पत्र पाठवून मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशांनूसार संपूर्ण कारवाई करण्यात आल्याचा आरोपदेखील राणा यांनी केला होता.अशात महाराष्ट्र सरकारकडून अहवालातून काय माहिती सादर केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.