जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरीही लोक अशाच ठिकाणी पैसे गुंतवतात जिथे ते 100% सुरक्षित असतात. भलेही व्याज कमी मिळाले तरी चालेल पण पैसे सुरक्षित असणे, हे मध्यम वर्गीय माणसांसाठी महत्वाचे असते. चांगले व्याजदर देणाऱ्या तसेच खात्रीपूर्वक पैसे गुंतवणूक करायच्या योजना सध्या पोस्ट ऑफिसकडे आहेत. मागच्या काही वर्षात पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा विस्तार देशभरात करण्यासाठी 820 कोटी रुपये भांडवल पुरवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता केंद्र सरकारने ह निर्णय घेतल्याने थेट गावोगावी बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये बँकिंग सेवा सुरू केली. यालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. एकूणच जेव्हा जेव्हा पोस्ट ऑफिसने नवीन सुविधा, योजना सुरू केल्या त्याला नागरिकांनी कायम भरघोस प्रतिसाद दिला.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या विस्तारासाठी हा फंड कमी पडल्यास आणखी 500 कोटींच्या निधीसाठी केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. देशात 1.56 लाखांहून अधिक पोस्ट कार्यालये कार्यरत आहेत. मात्र आपीपीबीचे कामकाज 1.30 लाख पोस्ट कार्यालयांतून सध्या सुरू आहे. हे कामकाज आता या निर्णयामुळे नक्कीच वाढणार आहे. आयपीपीबी 1,56,434 पोस्ट कार्यालयांपर्यंत आपली सेवा विस्तारणार आहे. समाजातील सर्वात गरीब नागरिक, महिला यांच्यापर्यंत पोस्टाची बँक पोहोचावी यासाठी केंद्र सरकार 820 कोटींची मदत या बँकेला देणार आहे.