ताजी बातमी ऑनलाईन टीम
वर्चस्ववादातून लक्षतीर्थ वसाहत येथील सासने कॉलनी येथील चौकात तलवारीसह धारदार शस्त्राने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात संतोष सोनबा बोडके (वय 40 रा.लक्षतीर्थ वसाहत) आणि कृष्णात कोंडिबा बोडेकर (वय 35) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.१६) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. अतिरक्तस्त्राव झाल्याने संतोष बोडके याची प्रकृती गंभीर बनली आहे.
सोमवारी रात्री उशिरा वाढदिवसाचे लावलेले बॅनर फाडण्याच्या कारणावरुन सदर घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तलवारीसह अन्य शस्त्राने डोक्यात पाठीवर हातावर वर्मी हल्ला करण्यात आला आहे. संतोष बोडके रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. किमान पाच ते सहा जणांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. सहाय्यक फौजदार भगवान गिरीगोसावी, हवालदार संजय कोळी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घडलेल्या घटनेमुळे लक्षतीर्थ वसाहत, सासने कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.