ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यसभेच्या उमेदवारीवरून राजकारण तापलं असताना, शिवसेनेचे सहावे उमेदवार संजय पवार आणि संजय राऊत यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. संभाजीराजे छत्रपती राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार का? ते उद्या कोणती भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर राजेंच्या कार्यकर्त्यांनी देखील ‘तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण, अशी भूमिका घेतली आहे. एकूणच राज्यभरातून संभाजीराजे छत्रपती यांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने राजें उद्या काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
राज्यसभेचे उमेदवारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचे सन्मान राखतील. अशी प्रतिक्रिया दोन दिवसांपूर्वी संभाजी राजे छत्रपती यांनी दिली होती. मात्र शिवसेनेने कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिली. मात्र संभाजीराजे यांच्याशी झालेल्या चर्चेच्या उलट घडले असून छत्रपती घराण्याचा अपमान केला. अशी भावना संभाजीराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर करत नाहीत, तोपर्यंत माझी प्रतिक्रिया देणार नाही. अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतले होती. मात्र आज शिवसेनेने संजय राऊत आणि राज्यसभेचे सहावे उमेदवार म्हणून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावरून आता छत्रपती संभाजीराजे यांनी भूमिका घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील मराठी पत्रकार भवनात ते आपली पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे संभाजी राजे छत्रपती हे कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळात सह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अपक्ष की माघार?
शिवसेनेने राज्यसभेचे सहावे उमेदवार संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष लढणार का? याबाबत ते उद्या भूमिका मांडणार आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून ते महाविकासआघाडी कडून पुरस्कृत उमेदवारी द्यावी यासाठी मागणी करत होते. मात्र संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे संभाजी राजे छत्रपती हे अपक्ष लढणार की राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेणार हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता समजणार आहे.