अनैतिक संबंधातून चंद्रकांत उत्तम हेगडे (वय 29, रा. नवीन वसाहत, टिंबर एरिया, सांगली) या तरुणास चाकूने भोसकण्यात आले. सांगली-कर्नाळ रस्त्यावर म्हसोबा मंदिरजवळ रविवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.
हेगडे याला भोसकताच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अंधार असल्याने तो मृत होऊन पडला आहे, असा समज करून हल्लेखोर पसार झाले. ते जाताच हेगडेने रक्तबंबाळ अवस्थेत भीतीने स्वत: दुचाकीवरून एकटाच नांद्रेपर्यंत प्रवास केला. तेथील दर्याजवळ तो पडला. हा प्रकार पाहून काही ग्रामस्थ त्याच्या मदतीसाठी धावले. त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तो बचावला.
याप्रकरणी समीर नदाफ, अमित भिसे व अल्ताफ नदाफ (सर्व रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) या तीन हल्लेखोरांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चंद्रकांत हेगडे हा सोमवारी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.