जगभरात कोरोनाच्या महामारीनंतर महागाई गगनाला भिडू लागली आहे. मागच्याच महिन्यात भारतात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट्स वाढवण्याची घोषणा केली. महागाईचे चटके आता सर्वसामान्यांना बसणार आहेत. भारतात आता जुलै महिन्यात असे काही बदल होणार आहेत, ज्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबाना बसणार आहे. पुढच्या 10 दिवसांनंतर जुलै महिना सुरू होणार आहे. जुलै महिना सुरु झाल्यानंतर घरगुती गॅसच्या दरात (Gas Price) बदल होईल. आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक न करणाऱ्यांना दंड भरावा लागेल. जर आधार पॅन लिंक नसेल तर 30 जूनपूर्वी हे काम करून घेतल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल. जुलैपासून दंडाची रक्कम 1000 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
जर तुम्ही शेअर्सची खरेदी-विक्री करत असाल आणि तुमचे डिमॅट खाते असेल, तर तुमचे ट्रेडिंग खाते केवायसी 30 जूनपर्यंत पूर्ण करा अन्यथा तुमचे खाते तात्पुरते बंद केले जाऊ शकते. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मागच्याच काही महिन्यात 30 टक्के कर लावण्यात आला आहे. आता क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना 1% टीडीएस भरावा लागणार आहे.
एलपीजी गॅसच्या किमतीही 1 जुलै पासून वाढणार आहेत. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. आता पुन्हा एकदा भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दिल्लीतील रहिवास्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. दिल्लीत तुम्ही 30 जूनपर्यंत मालमत्ता कर जमा केल्यास तुम्हाला 15 टक्के सूट मिळेल. ही सवलत 30 जूननंतर मिळणार नाही.