कोविड१९चा प्रभाव हळूहळू कमी होत असतानाच करोनाच्या नव्या प्रकरणांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. त्यातच आता करोनाचे नवे व्हेरिएन्ट सापडल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून संपूर्ण जग या महामारीविरुद्ध लढा देत आहे, मात्र अजूनही हे संकट कायम आहे. त्यातच आता एक नवीन बातमी समोर आली आहे. असे सांगण्यात येत आहे की करोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचे काही उप-प्रकार सापडले आहेत. यामुळेच अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे भारतातही ओमिक्रॉनचा नवा उपप्रकार सापडला आहे. यामुळे शासनाच्या चिंतेत भर पडली आहे. यानंतर हिवाळ्यात पुन्हा एकदा करोनाची नवी लाट येणार का? असा प्रश्न पडला आहे.
ओमिक्रॉन हा विषाणू तुलनेने कमी घातक असला तरीही ते आणि त्याच्या उप-प्रकारांमध्ये वेगाने पसरण्याची क्षमता आहे. नुकत्याच सापडलेल्या ओमिक्रॉनच्या बीए.५.१.७ आणि बीएफ.७ या उपप्रकारांमध्ये झपाट्याने पसरण्याची क्षमता असून दिवाळीपर्यंत त्यांच्यामुळे करोनाची नवी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ओमिक्रॉन बीएफ.७ हा उपप्रकार सर्वप्रथम उत्तर-पश्चिम चीनच्या अंतर्गत मंगोलिया स्वायत्त प्रदेशात आढळून आला. याला ‘ओमिक्रॉन स्पॉन’ असेही म्हणतात. हा नवीन प्रकार झपाट्याने पसरत आहे. असे सांगितले जात आहे की अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमसह इतर अनेक देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
भारतात बीएफ.७ चे पहिले प्रकरण गुजरात या राज्यात आढळले. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने याबाबत माहिती दिली आहे. अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चीनमधील करोनाच्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीमागे बीए.५.१.७ आणि बीएफ.७ हे उपप्रकार कारणीभूत आहेत.
बीएफ.७ मुळे चिंता वाढण्याचं कारण काय?
काही अभ्यासांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, या उपप्रकारामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याची क्षमता आहे. हे विषाणू ओमिक्रॉनच्या कोणत्याही उप-प्रकारापेक्षा संसर्ग किंवा लसीकरणातून मिळवलेल्या प्रतिपिंडांविरुद्ध लढण्यास जास्त सक्षम आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने संक्रमणाचा धोका आणखीनच वाढला आहे. एनटीजीआयचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा म्हणतात की पुढील दोन ते तीन आठवडे खूप महत्त्वपूर्ण आहेत. कोविड१९ अजूनही संपलेला नाही आणि जगाच्या विविध भागांमध्ये नवीन प्रकरणे वाढत आहेत. साहजिकच भारतातही याचा धोका वाढू शकतो.
दरम्यान, ओमिक्रॉन बीएफ.७ ची सामान्य लक्षणे ही पूर्वीच्या उपप्रकारांप्रमाणेच आहेत. जर तुम्हाला घसा खवखवणे, रक्तसंचय, थकवा, खोकला आणि नाक वाहणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, वेळ न दवडता तपासणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. येत्या काही दिवसांत दिवाळी, धनत्रयोदशी, आणि भाऊबीज असे मोठे सण येत आहेत. त्यामुळेच प्रत्येकाने सावधगिरी बाळगून मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे, या गोष्टी कराव्यात.