‘ऑफिसला येत असाल तर घरी परत जा…’ असे ई-मेलद्वारे फर्मान काढत ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी जगभरातील कर्मचारी कपात सुरू केली आहे. ट्विटरमधील कर्मचारी कपातीचं लोण आता भारतात देखील पोहोचलं आहे. ट्विटर इंडियाचे (Twitter India) 200 हून जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून (Twitter Layoffs in India) काढून टाकण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे एलन मस्क यांनी भारतातील मार्केटिंग कम्युनिकेशन विभागच पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंजिनिअरिंग, सेल्स विभागात मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील ट्विटरच्या मार्केटिंग कम्युनिकेशन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. आपल्या सहकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे आणि काही सहकाऱ्यांना नोकरीवर कायम ठेवल्याचे ईमेल आल्याचे टि्वटरच्या ट्विटर इंडियाच्या अधिकाऱ्यांने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.
एलन मस्क यांनी ट्वीट करून सांगितलं कर्मचारी कपातीचं कारण…
एलन मस्क यांनी ट्वीट करून कर्मचारी कपातीचं कारण देखील सांगितलं आहे. कंपनीला प्रत्येक दिवसी चार मिलिअन डॉलर्स म्हणजेच जवळपास 32 कोटी रुपयांहून जास्त नुकसान होत आहे. त्यामुळे व्यवस्थापनाकडे कर्मचारी कपातीशिवाय दुसरा मार्ग नाही. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे, त्यांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि पाच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. ट्विटरने केलेल्या कपातीच्या कारवाईविरुद्ध आता या अधिकाऱ्यांनी सॅनफ्रान्सिस्कोच्या कोर्टात धाव घेतली आहे.
75 टक्के कर्मचारी कपात…
एलन मस्क यांनी यांनी सुमारे 44 अब्ज डॉलर्सला सोशल मीडिया प्लॉटफॉर्म ट्विटर खरेदी केले. त्यानंतर मस्क यांनी व्यवस्थापनात मोठे बदल करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून ट्विटरला मंदीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी एलन मस्क यांनी जागतिक स्तरावर टाळेबंदीचे आदेश दिले आहेत. ट्विटरने भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरमध्ये कर्मचारी कपात करण्यात येईल, असं एलन मस्क यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. कर्मचारी संख्या 75 टक्के कमी करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
आता 12 तास काम लागणार…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक फर्मान काढला होती. कर्मचाऱ्यांना आता 12-12 तास काम करावे लागणार, असे त्यात सांगण्यात आले होते. तसेच कामात कोणतीही कुचराई होता कामा नये, असा इशारा देखील देण्यात आला होता.