छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट आक्रमक झाला असून आमदार संजय गायकवाड यांनी थेट इशारा देत छत्रपतींचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील असं म्हंटल आहे.
ज्यांना छत्रपती म्हटलं जातं त्यांना एकेरी भाषेत शिवाजी म्हणतात. शिवाजी जुने झाले. या राज्यपालांना कळायला पाहिजे की, शिवविचार हा कधी जुना होत नसतो. त्यांची तुलना जगातील कुठल्याही महापुरुषासोबत होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीला राज्याच्या इतिहासाबद्दल माहिती नाही, अशा राज्यपालांना खुर्चीवर ठेऊन काही फायदा नाही. त्याला राज्यपाल पदावरुन घालवावं, असं संजय गायकवाड म्हणाले.
शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबला पत्र लिहिलं असा दावा भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला होता त्यावरही संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली. औंरगजेबाच्या दरबारात कोणी ताठ मानेनं उभं राहत नव्हतं. त्या काळात शिवाजी महाराजांनी ताठ मानेनं उभं राहून औरंगजेबाला सुनावलं होतं. राज्यपालांनी, भाजपच्या लोकांनी छत्रपतींचा केलेला आम्ही सहन करू शकत नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण होईल, याचे परिणाम दोघांना भोगावे लागतील इशारा संजय गायकवाड यांनी दिला.