कोल्हापूर इचलकरंजी पाठोपाठ आता पंचगंगा नदी काठाची ही वाटचाल हळूहळू दूधगंगेकडे होऊ लागली आहे. त्यामुळे दूधगंगा नदी कटाची मात्र वाटचाल मराठवाड्याकडे होण्याची भीती बळावत चालली आहे.गांधीनगर, उचगाव, मुडशिंगी, वळीवडे, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, कंदलगाव, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, गोकुळ शिरगाव, कनेरी, वाडदे वसाहत, आधी सह १३ गावांना दूधगंगेतून पाणी ही ३५६ कोटींची योजना मंजूर झाली आहे.
राजकीय स्वार्थापोटी लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात आपले वचक निर्माण करण्यासाठी पाणी वाटपाबाबतचा कोणताही ठोस अभ्यास न करता योजना मंजूर करून आणत आहेत. मात्र यामुळे दूधगंगा नदी काठ दुष्काळाच्या खाईत लोटला जाणार आहे याची मात्र जाणीव लोकप्रतिनिधींना दिसून येत नाही.
पंचगंगा नदी काठावरील या १३ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३५६ कोटींची ही योजना मंजूर झाली आहे. याचे काम ही हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले आहे. दूधगंगा काठावर कागल जवळ याचे जॅकवेल उभारले जाणार असून दूधगंगेतून ४० एम एल डी पाण्याचा दररोज उपसा होणार आहे. त्यामुळे आधी थेट पाईपलाईन त्यानंतर इचलकरंजी व आता पंचगंगा काठावरील या 13 गावांची योजना जर कार्यान्वित झाल्या तर दूध गंगेत पाणी उरणार तरी किती व यातून दूधगंगा नदी काठाची पाण्याची गरज भागणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इचलकरंजी मनपा आयुक्तांनी या योजनांचा उल्लेखच केला नाही.
आता तरी दूधगंगा नदीकाठ जागे होणार का ?
दिवसेंदिवस दूधगंगेतून विविध योजनांना मंजुरी मिळत असताना निद्रा अवस्थेत असलेला दूधगंगा नदी काठ आता तरी जागे होणार का? जर या योजना कार्यान्वित झाल्या तर दूधगंगा नदी काठाची मराठवाडा, विदर्भ होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अशी स्थिती येऊ द्यायची नसल्यास मंजूर सर्वच योजनांना एकवटून पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्यासाठी पेटून उठणे गरजेचे बनले आहे. अन्यथा दूध गंगा नदी काठाचे भविष्य अंधकारमय होणार यात काही शंका नाही.