ताजी बातमी ऑनलाईन टीम
गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीचा सामना होणार असल्याचा अंदाज आहे. ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि अंतिम सामनाही याच मैदानावर १८ नोव्हेंबरला खेळवली जाईल. हाती आलेल्या वृत्तानुसार भारत या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या १३व्या पर्वात १० संघ खेळणार आहेत आणि त्यापैकी ८ संघ आजच निश्चित झाले आहेत. उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल होतील.
पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ १५ ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) लवकरच वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करतील. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नंतर ही घोषणा होण्याची शक्यता आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. महत्त्वाची बातमी म्हणजे पाकिस्तानने वर्ल्ड कप २०२३ साठी भारतात येण्याची तयारी दाखवली आहे.
![](https://tajibatmi.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image576926241-1683861842128.jpg)
आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते अन् भारतीय संघाने जाण्यास नकार दिल्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी बहिष्काराची भाषा केली होती. पण, त्यांचा पवित्रा नरमला, परंतु त्यांनी भारत-पाकिस्तान सामना अहमदाबाद येथे खेळवण्यास नकार दिला आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी १० संघांमध्ये ४८ सामने होतील. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांनी मुख्य स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. जून महिन्यात झिम्बाब्वे येथे उर्वरित दोन संघांसाठी पात्रता फेरी होईल. त्यात वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड, झिम्बाब्वे, नेदरलँड्स, ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात चुरस होईल.