सर्वोच्च न्यायालयाने नुकताच काँग्रेसनेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या शिक्षेतून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. राहुल गांधी उद्या लोकसभेतही उपस्थित राहू शकणार आहेत. त्यातच आज काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्रातील नेत्या रजनी पाटील यांना दिलासा देतना त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
सभागृहात व्हिडिओ बनवल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते.राकेश सिन्हा आणि सरोज पांडे यांनी रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला होता. तो मान्य करण्यात आला. पाटील यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. याबाबत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर लवकरच निर्णय घेऊ शकतात. सर्व विरोधकांनी हा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला होता.अर्थसंकल्पीय अधिवेशनात रजनी पाटील यांनी सदनाचे कामकाज मोबाईलवर चित्रीत करून ते सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप होता. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरही विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांचे निलंबन वाढवण्यात आले होते.