इचलकरंजी, शहर व परिसरात आज दिवसभर पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे सायंकाळनंतर वातावरणामध्ये निर्माण झालेल्या गारव्यामुळे वस्त्रनगरी गारठली होती. पावसामुळे काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
गेल्या दोन दिवसापासून शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीच्या सुमारास त्याचबरोबर दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास तसेच सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारासही जोरदार पाऊस झाला. यामुळे रविवारी मुख्य रोडवर अनेक लहान-मोठ्या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. अनेक सखल भागात पाणी साचले होते. महासत्ता चौकात मुख्य रस्ता खचला आहे. त्याठिकाणी मुरूम टाकण्याऐवजी मातीचा भराव टाकल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.
गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी शेतात सरीमध्ये पाणी साचले आहे. शिवाय पंचगंगेच्या पाणी पातळीमध्येही वाढ झाली आहे. पावसामुळे दिवसभर हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. वातावरणातील या बदलामुळे साथीच्या रोगाचा फैलाव होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.