इचलकरंजी/प्रतिनिधी –
सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या ‘इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि माझी भूमिका’ या विषयावरील जाहीर सभेची तारीख निश्चित झाली आहे. शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौक येथे ही सभा होणार असल्याची माहिती ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.
सध्या इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या पिण्याच्या पाण्यावरुन शहरात चर्चेला ऊत आला आहे. सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेला कागल तालुक्यासह नदीकाठावरील गांवातून तीव्र विरोध होत आहे. इचलकरंजीकरांनी कृती समितीच्या माध्यमातून शासनाने मंजूर केलेली योजना कार्यान्वित करावी यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरु केले आहेत. तर पाणी योजनेवरुन सुरु असलेले मतप्रवाह या संदर्भात सर्वंकष माहिती देण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि माझी भूमिका’ या विषयावर जाहीर सभेत बोलू असे जाहीर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ताराराणी पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्यांची नियोजन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे होते.
या जाहीर सभेत पंचगंगा व कृष्णा योजना बळकटीकरण, सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी योजना, योजना सुरु करताना आलेल्या अडचणी, कोण कोण अडथळे निर्माण केले यासह विधानसभा निवडणूकीत दिलेली आश्वासने, केलेली वचनपूर्ती आणि मार्गी लावण्यात येणारे प्रश्न याचा संपूर्ण ऊहापोह आमदार आवाडे यांच्याकडून केला जाणार आहे. या जाहीर सभेच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये भागाभागात बैठका घेण्यासह जनजागृती करण्याचा, माहितीपत्रकाद्वारे तळागाळापर्यंत माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, सौ. उर्मिला गायकवाड, चंद्रकांत पाटील, राजू बोंद्रे, श्रीरंग खवरे, तात्या कुंभोजे, राहुल घाट, मोहन काळे, सुहास कांबळे आदींसह उपस्थित पदाधिकार्यांनी पाणी व्यतिरिक्त आमदार आवाडे यांनी विविध विषयांबद्दल भाष्य करावे अशा सूचना केल्या. त्या अनुषंगाने जाहीर सभेचे नियोजन करण्यात येत आहे.
याप्रसंगी संजय केंगार, नरसिंह पारीक, सर्जेराव पाटील, शेखर शहा, सतिश मुळीक, बंडोपंत लाड, महेश सातपुते, शंकर येसाटे, राजाराम बोंगार्डे, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, सतिश कोष्टी, शिवाजी जुवे, महावीर केटकाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.