चांद्रयान-3 बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या यानाला पृथ्वीबाहेर पोहोचवणाऱ्या LVM3 M4 या रॉकेटचा एक भाग आता पृथ्वीच्या वातावरणात परत आला आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने सांगितलं, की संभाव्य इम्पॅक्ट पॉइंट हा पॅसिफिक महासागराच्या वर असू शकतो. अंतिम ग्राउंड ट्रॅक हा भारतावरुन गेला नसल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजून 42 मिनिटांनी रॉकेटचा हा भाग पृथ्वीच्या वातावरणात आला.
हा भाग म्हणजे एलव्हीएम 3 रॉकेटचा क्रायोजेनिक वरचा भाग असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. लाँच झाल्यानंतर सुमारे 124 दिवसांमध्ये हा भाग पृथ्वीच्या कक्षेत परत आला असल्याचं सांगण्यात येत आहे.भारताने रचला इतिहास
14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. यानंतर चांद्रयान-3 ने पुढील 14 दिवस अपेक्षित डेटा गोळा करून ही मोहीम फत्ते केली होती.
प्रज्ञान-विक्रम चिरनिद्रेत
चांद्रयान-3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे चंद्रावर चिरनिद्रा घेत आहेत. मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्लीप मोडवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर चंद्रावर रात्र सुरू झाल्यामुळे हे दोन्ही डिव्हाईस फ्रीज झाले. पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर लँडर-रोव्हरला सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याला अपयश मिळालं. यानंतर हे मिशन पूर्णपणे संपल्याची घोषणा करण्यात आली.