जल आणि वायू प्रदुषणास जबाबदार धरुन इचलकरंजी आणि परिसरातील ६ सायझिंगना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाकडून क्लोजर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व उद्योगांचे पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्यात निर्देशही देण्यात आले आहेत. यामध्ये श्री ईगल सायझिंग वर्क्स इचलकरंजी, गोविंद सायझिंग इंडस्ट्रीयल इस्टेट, गजानन सायझिंग तारदाळ, सिध्दीविनायक सायझर्स तारदाळ, गणेश सायझिंग राजेश्वरीनगर, मुदगल सायझिंग गणेशनगर यांचा समावेश आहे.
इचलकरंजीतील पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न सातत्याने गंभीर बनत चालला आहे. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने याठिकाणी सायझिंग, प्रोसेसिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणाहून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर सोडले जाणारे सांडपाणी हे विनाप्रक्रिया | थेट गटारीत सोडले जात असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहेत. हे रसायनमिश्रित सांडपाणी काळा ओढाद्वारे थेट पंचगंगा नदीत मिसळून नदी प्रदुषण वाढतच चालले आहे. या संदर्भात सातत्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे सामाजिक कार्यकर्त्यांकडून तक्रारी केल्या जात होत्या.
त्यानुसार प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहर व परिसरातील विविध सायझिंगना भेटी देऊन तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.
तपासणीमध्ये प्रदुषणास कारणीभूत गंभीर प्रकार निदर्शनास आल्याने जल प्रदुषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम १९७४, हवा प्रदुषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम तसेच घातक कचरा आणि २००८ नुसार घोषित केलेल्या प्रदुषण प्रतिबंधक क्षेत्राचे उल्लंघन केल्याबद्दल जबाबदार धरून प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. उपरोक्त सहा सायझिंग ७२ तासात बंद करण्यासह त्यांचा वीज व पाणी पुरवठा खंडीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.