पंतप्रधान पेन्शन योजनेतून मंजूर झालेले पैसे काढून देतो, असा बहाणा करून माडगुळे (ता. आटपाडी) येथील महिलेला दुचाकीवर बसवून आटपाडीकडे आणताना तिच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि कानातील फुले लुटल्याची घटना घडली. याची तक्रार आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली असून, अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माडगुळे येथील लक्ष्मी आप्पा काटे (वय. ६५) या आटपाडीत आल्या होत्या. त्या माडगुळेला जाण्यासाठी सांगोला चौकात थांबल्या होत्या. त्या वेळी अनोळखी दुचाकीस्वार त्यांच्याकडे आला. त्याने काटे यांना ‘पेन्शनचे तीस हजार रुपये मंजूर झाले असून, ते काढून देतो,’ असे सांगितले. महिलेला दुचाकीवर बसवून घेऊन गेला.आटपाडी-खानजोडीवाडी रस्त्यावर आल्यावर या दुचाकीस्वाराने काटे यांच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची बोरमाळ व कानातील फुले व रोख दोन हजार रुपये तिच्याकडून फसवून काढून घेत पोबारा केला. फसवणूक झाली असल्याचे समजताच लक्ष्मी काटे यांनी आटपाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला.