बावची,येथील अथर्व ओंकार लाटणे (वय १०) या शाळकरी मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून शनिवारी मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामपंचायतीने रविवारी प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवली. दुकानांचे फलक, झाडे, छपऱ्या, डिजिटल पोस्टर्स काढून टाकली. शनिवारी दुपारी अथर्वचा ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला होता.
अतिक्रमणांमुळे हा रस्ता अरुंद झाला होता. हे लक्षात घेऊन सरपंच कविता अनुसे, उपसरपंच नितीन पाटील, लालासाहेब अनुसे यांनी सर्व सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी व तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. अनधिकृत बांधकामे व रस्त्यावर ठेवलेले साहित्य काढून टाकले. रस्ता मोकळा केला. ग्रामस्थांनीही विरोध न करता सहकार्याची भूमिका घेतली. यामुळे बऱ्याच काळानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.