रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी-२० फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. विराट कोहलीही पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेत दिसणार नाहीत. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अखेरचे नोव्हेंबर २०२२ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्याने, विराट कोहली आणि रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही खेळताना दिसतील, असा अंदाज बांधला जाऊ शकतो. एवढेच नाही, तर तो पुन्हा एकदा टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे.संजू सॅमसनवर व्यक्त केला विश्वास –
हार्दिक पंड्याने नोव्हेंबर २०२२ पासून टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र दुखापतीमुळे तो संघाचा भाग असणार नाही. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. इशान किशनच्या जागी निवडकर्त्यांनी संजू सॅमसनवर विश्वास व्यक्त केला असून तो बऱ्याच कालावधीनंतर टी-२० संघात परतला आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीत होणार आहे. दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये तर तिसरा सामना १७ जानेवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेपूर्वी ही मालिका खूप खास –
टी-२० विश्वचषक २०२४ ही स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानसोबतची ही मालिका टीम इंडियासाठी खूप खास आहे. या मालिकेत टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या तयारीची चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेनंतर २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघात कोणत्या खेळाडूला स्थान मिळेल हे जवळपास निश्चित होणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्च्या टी-२० मालिकेसाठी १६ सदस्सीय भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.