बदलापूरमध्ये (Badlapur Crime Updates) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मैत्रिणीनं पीडितेला बर्थडे पार्टीसाठी आपल्या घरी बोलावलं. पण, मैत्रिणीच्या चुकीच्या भूमिकेमुळे मात्र मैत्रिणीचा घात झाला. मैत्रिणीनं पीडितेला गुंगीचं औषध पाजलं. त्यानंतर ती बेशुद्ध झाली, याचाच फायदा घेत मैत्रिणीच्या घरच्या बाथरुममध्ये पीडितेवर अत्याचार केला. एवढंच नाहीतर, तो तिला तसंच अर्धनग्न अवस्थेत बाथरुममध्ये सोडून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बड्डे गर्लसह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षांच्या तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचयातील एका तरुणानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तरुणीला गुंगीचं औषध देणाऱ्या तिच्या जीवलग मैत्रिणीला देखील अटक केली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं घडलं काय?
बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची बदलापूर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. भूमिका असं या तरुणीचं नाव आहे. 5 सप्टेंबरला भूमिकाचा वाढदिवस असतो. दोन दिवसांपूर्वी भूमिकानं वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. पार्टी चांगली रंगात आली होती. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती. पार्टी संपल्यावर पीडित तरुणी घरी जायला निघाली. मात्र, त्यावेळी तिला चक्कर आली. मळमळ जाणवू लागली आणि तिने उलट्या केला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीनं तिला पुन्हा घरात नेलं आणि लिंबू पाणी प्यायला दिलं. पण, मैत्रिणीनं दिलेलं पाणी फक्त लिंबू पाणी नव्हतं, तर त्यात गुंगीचं औषध मिसळलं होतं.
मैत्रिणीनं पीडितेला लिंबू पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर एकानं पीडितेला बाथरुमध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिथेच अर्धनग्न अवस्थेत तरुणीला सोडून पळ काढला. पीडित तरुणी दारू पिऊन बेशुद्ध झाल्याचं मैत्रिणीनं तिच्या वडिलांना फोन करून सांगितलं. पीडितेचे वडिल पहाटे मैत्रिणीच्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर वडिलांनी दारू का प्यायली? अशी विचारणा करत पीडितेला मारहाण सुरू केली. त्यानंतर पीडितेनं वडिलांना तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण प्रकार सांगितला. पीडितेच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना फोन केला.
पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीसोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जीवलग मैत्रिणीसह आरोपीवरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.