राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. परंतु या योजनेचे लाभ घेण्यासाठी वेगवेगळे फंडे काही जणांकडून वापरण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला. १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या अर्ज भरणाऱ्या भावांची चौकशी सुरु केली आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.
काय घडला प्रकार
कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास बहिणी ऐवजी १२ भावांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला. त्या लोकांनी फक्त महिलेचे छात्राचित्र वापरले. हा प्रकार समोर आल्यानंतर १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या १२ जणांव्यतीरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.
आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. त्यात १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले.
चौकशी सुरु- शंभूराज देसाई
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले जात नव्हते. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ही नवीन योजना होती. त्यामुळे अनावधाने नाव घेतले जात नव्हते. आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच उल्लेख केला जात आहे. महायुतीतील सगळे पक्ष आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख करत आहेत. कन्नडमधील त्या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. या योजनेतून एकही महिला वंचित राहू नये, असा प्रयत्न आहे. परंतु बोटावर मोजण्या इतके लोकांनी कन्नडसारखा प्रकार केला आहे. आता त्याची चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे, असे देसाई म्हणाले.