आपल्या सुपीक जमिनीसाठी आणि मुबलक पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण उसाला फाटा देऊन सांगलीच्या उदय पाटलांनी थायलंडचे पेरू लावले आणि आता दरवर्षी केवळ दीड एकरातून हा शेतकरी 20 लाख रुपये कमावतोय. पेरू सोबत अंतर लागवड म्हणून झेंडूचे रोपे लावल्याने या शेतकऱ्याच्या जमिनीची सुपीकता वाढली आहे. आता वर्षातून दोन वेळा पेरूचे उत्पादन होतं. सरासरी 35 टन उच्च दर्जाच्या पेरूची विक्री हा शेतकरी करतोय.
उसाची शेती सोडून पेरू आणि बागायत शेतीकडे वळल्याने उदय पाटील यांना उत्पन्न वाढण्यास मदतच झाली आहे. शिवाय शेतीमध्ये जोखीम घेण्याची क्षमता ही त्यांची वाढली आहे. कमी वेळात अधिक चांगलं उत्पन्न मी मिळवू शकतो असा विश्वास ते व्यक्त करतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत योग्य अंतर पीक निवडल्याने या शेतकऱ्याचा चांगला फायदा झाला आहे. (Success Story)
एक पेरू किलोभर वजनाचा
पुणे पूलमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, सांगलीच्या कासेगाव येथील उदय पाटील या प्रगतशील शेतकऱ्याने पारंपरिक ऊस न लावता आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या दीड एकर शेतात वीएनआर थायलंड जातीचे पेरू लावले. पेरूच्या बागेची 18 महिने काळजी घेतली. पहिल्याच वेळेस प्रयत्न यशस्वी झाला. पहिल्या पिकातून 15 टन पेरूचे उत्पादन मिळाले आणि चांगली सुरुवात झाली.
मग उदय पाटील यांनी स्वतःला फक्त पेरू लागवडी पुरताच मर्यादित ठेवलं नाही. फळझाडासोबत झेंडूच्या रोपांचा अंतर पीक लावलं. आणि जमिनीची सुपीकता वाढली. पेरूच्या बागेतून वर्षातून दोन वेळा पेरूचे उत्पादन आलं. 15 टनाचे 35 टन पेरू झाले. उदय पाटील यांच्या प्रत्येक पेरूचं वजन सुमारे 1 किलो आहे. आणि बाजारात या पेरूची किंमत 60 ते 65 किलो प्रति किलो आहे. त्यामुळे यांना पेरूच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळतंय.