किरकोळ स्वरुपाच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाचा चाकूने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ असलेल्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, म्हेळूस्के (ता. दिंडोरी) येथील हरी दत्तू बरडे व शरद दत्तू बर्डे हे लखमापूर येथे असलेल्या राशी फर्टिलायझरसमोरील पेट्रोलपंपालगत असलेल्या भागात त्यांच्या परिचितांकडे गेले होते. तेथे त्यांचा वाद झाला व तेथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील लखमापूर गावातील फळविहिरीजवळ त्यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक झाली. संतापाच्या भरात हरी दत्तू बर्डे (रा.म्हेळुस्के) याने त्याचा सख्खा भाऊ शरद दत्तू बर्डे यास पूर्ववैमन्यातून घडलेल्या वादातून शिवीगाळ केली.
दरम्यान, संशयित हरी बर्डे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शरद याचा चाकूने खून केल्याची कबुली दिली. खुनाच्या गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. सख्ख्या भावाचा खून करण्यामागे काही वेगळे कारण आहे? का याचा शोध पोलिस घेत आहेत. दत्तू बर्डे याच्यावर तुषार शरद बर्डे याच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
छातीवर-मांडीवर चाकूने सपासप वार
हरी बर्डे याने शरदच्या छातीवर व मांडीवर धारधार चाकूने सपासप वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शरदला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी अंती रक्तस्त्राव झाल्याने शरद याचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.22) रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. वणी पोलिसांना ही माहिती मिळताच सुनील पाटील व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.