पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केलाय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर गुरुवारी रात्री पाकिस्तानने एअर स्ट्राइक केला. अफगाणिस्तानात तालिबानच शासन आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिल्यानंतर काही तासात हा हल्ला झाला. ‘आता भरपूर झालं. इस्लामाबाद आता अफगाणिस्तानात सुरु असलेले दहशतवादी तळ अजिबात सहन करणार नाही’, ख्वाजा आसिफ यांच्या इशाऱ्यानंतर काही तासात पाकिस्तानकडून हा भीषण हल्ला झाला. काबूल शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. पण कुठल्या नुकसानीच वृत्त नाहीय असं असं पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनने अफगाण तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदच्या हवाल्याने म्हटलं आहे.
अफगाण तालिबानचा प्रवक्ता म्हणाला की, “काबूल शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. कोणी चिंता करण्याची आवश्यकता नाही. सर्व ठीक आहे. घटनेची चौकशी सुरु आहे. अजूनपर्यंत कुठे काही नुकसान झाल्याच वृत्त नाहीय”
डॉनच्या वृत्तानुसार, स्फोटात एका लँड क्रूजर गाडीला टार्गेट करण्यात आलं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रात्री जवळपास 9.50 च्या सुमारास दोन स्फोटाचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने स्पष्ट केलय की, त्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी गुरुवारी अफगाण तालिबानला निर्वाणीचा इशारा दिला होता. पाकिस्तानचा संयम आता संपला आहे, असं ते म्हणालेले. अफगाणिस्तानातून पाकिस्तान विरोधात दहशतवादी कारवाया सुरु आहेत. पण त्या विरोधात कुठलीही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली.
ख्वाजा आसिफ पाकिस्तानी संसदेत काय म्हणाले?
“आता भरपूर झालं. पाकिस्तान आता अफगाणिस्तानातून चालणारा दहशतवाद सहन करणार नाही” असं आसिफ नॅशनल असेंबलीमध्ये बोलताना म्हणाले. ऑरकजई जिल्ह्यात प्रतिबंधित संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) सोबत संघर्षात लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी आणि एका मेजरसह 11 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानात अफगाणिस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. कारण तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेला अफगाण तालिबानचा आश्रय असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हा हल्ला केलाय. आज शुक्रवारी 10 ऑक्टोंबर रोजी ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुत्ताकी 9 ते 16 ऑक्टोंबर अशा दीर्घ भारत दौऱ्यावर आहेत. 2021 साली अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतरचा त्यांचा हा पहिला भारत दौरा आहे.




